सांगली महाविकास आघाडीची उमेदवारी, काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त
सांगली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या उमेदवारीच्या घोषणे नंतर मात्र सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कडून आज सांगलीत काँग्रेस कमिटीच्या बाहेर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. काँग्रेसच्या सांगलीच्या मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर केला असा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दोन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी तिढा निर्माण झाला होता. अखेरीस महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सांगलीची जागा देण्यात आली असून चंद्रावर पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी दिल्ली दरबारी आपले सर्व वजन वापरलं मात्र काँग्रेसला ही जागा मिळवण्यात अखेरीस अपयश आलं. अचानकपणे शिवसेनेने या मतदार मतदार संघावर दावा केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. उमेदवारी मिळाली नाही तर टोकाचा निर्णय घेणार असं सांगणारे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ML/ML/SL
9 April 2024