बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार कटिबद्ध

 बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार कटिबद्ध

सांगली, दि ११- शेतकरी उन्नती, दुग्ध व्यवसायाला चालना आणि सहकार चळवळीचे बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज इंदिरा पॅलेस सभागृहात पार पडलेल्या वाळवा शिराळा को. ऑप. डेअरी लि. रेठेधरण ता. वाळवा नूतन संचालक निवड व दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यात दिली. तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही पश्चिम महाराष्ट्रसारख्या सहकारी तत्वाच्या माध्यमातून कशी बळकटी देता येईल याचा विचार करावा, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली.

सदर कार्यक्रमाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आ. सदाभाऊ खोत, आ. सुरेश खाडे, आ. सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आ. भगवानराव साळुंखे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, निमंत्रक भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली बँकेचे संचालक राहुल महाडिक यांसह मोठ्या संख्येने सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले कि, या भागात २०२१ मध्ये सुरु झालेला हा प्रवाह आणि या प्रवाहाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या भागातील, तीन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा पूरक व्यवसाय म्हणून उचलून धरले. जवळजवळ तिन्ही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी असणारी १२०-१३० दूध संकलन केंद्रातून ४० हजारापेक्षा जास्त लिटर संकलन होतेय. खऱ्या अर्थाने या भागाला वेगळ्या पद्धतीचा आयाम देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सम्राट महाडिक आणि त्यांचे सहकारी करत आहेत. प्रत्येक क्षेत्र येणाऱ्या काळात महाराष्ट्राला एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाणार आहे. त्यात सर्वात मोठी भूमिका शेतकरी बांधवांची असणार आहे. तुम्ही जे पाऊल उचलले आहे ते येणाऱ्या काळात काही देशांत विशेषतः फक्त दूध या विषयावर तेथील असणारी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ब्राझील, जर्मनी यांसारख्या देशात प्रत्येक व्यक्ती हा ज्या पद्धतीने काम करतो त्यात नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन कसे होईल व जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या पद्धतीने फक्त दूधच नाही तर दुग्धजन्य पदार्थ जगाच्या पाठीवर पाठवून अर्थक्रांती करण्याचा प्रयत्न अनेक देशांनी केला आहे. महाराष्ट्रात व केंद्रात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आपल्या पाठीशी खंबीर उभे राहील, असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

डेअरी प्रकल्पाला मुंबई बँकेमार्फत

भविष्यात अर्थपूरवठा करू-दरेकर

आमदार प्रविण दरेकर म्हणाले कि, महाडिक युवा, आक्रमक नेते आहेत. श्रद्धा-सबुरीचे फळ काय असते त्याचे उत्तम उदाहरण सम्राट महाडिक आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणावर सहकाराच्या माध्यमातून झाला. परंतु दुर्दैवाने येथे सहकार क्षेत्राचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कधीकाळी सहकारी तत्वावर साखर कारखाने होते. परंतु ते कारखाने खासगी झाले आहेत. अनेक सहकारी संस्थांचे खासगीकरण झालेय. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सहकार क्षेत्राची वाईट अवस्था झालीय. दूध उत्पादक संघ असो किंवा सहकारी संस्था त्या चालवणे जिकरीचे झाले असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच दरेकर पुढे म्हणाले कि, नुकतीच राज्य सहकारी संघाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत ताकदीने उतरलो व २१ पैकी २० जागा आपल्या सहकारी पॅनेलच्या निवडून आणल्या. त्यातील १३ संचालक भाजपचे आहेत. येणाऱ्या काळात नव्या पिढीला शिक्षण, प्रशिक्षण देण्याची भूमिका राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून निभावायची आहे.

तसेच आ. दरेकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे विनंती करताना म्हटले कि, कोकणात हळदीचा प्रयोग झाला. हळदीचे उत्पादन सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुरु झालेय. कोकणचा प्रदेशही अशा प्रकारच्या दूध डेअरी, फलोत्पादनवर प्रक्रिया करणारे कारखाने काढून कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही पश्चिम महाराष्ट्रसारख्या सहकारी तत्वाच्या माध्यमातून बळकटी कशी देता येईल याचा विचार करावा. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *