‘संगीत संन्यस्त खडग’ नव्या स्वरूपात पुन्हा रंगमंचावर

मुंबई दि २७: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून साकार झालेले ‘संगीत संन्यस्त खडग’ हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात पुन्हा रंगमंचावर सादर होणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ८ जुलै १९१० रोजी स्वा. सावरकरांनी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून जगप्रसिध्द उडी मारली होती. या दिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानने ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग योजला आहे. स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत असून याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहोत, असे साठे म्हणाले. नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिमति असून मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार व दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून संगीत कौशल इनामदार यांचे आहे. भव्य आणि आकर्षक सेट्स, देखणी वेशभूषा, कलाकारांचा चोख अभिनय आणि सावरकरांचे तेजस्वी विचार ही या नाटकाची वैशिठ्ये आहेत.
मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य ओमप्रकाश शिंदे आणि ऋषिकेश जोशी हे कलाकार या नाटकात भूमिका करणार आहेत. हे नाटक नव्या स्वरूपात व्यावसायिक रंगमंचावर येत असून देशात जिथे जिथे मराठी समाज आहे तेथे हे नाटक पोहोचेल. याचे १०० प्रयोग करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे, असे प्रतिपादन रवींद्र साठे यांनी केले. नाटकाची तिकीट विक्री नाट्यगृह तसेच book my show वर दि. ५ जुलै पासून सुरु होणार असून अधिक माहितीसाठी ८१०८०२४६०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या नाटकास अधिकाधिक लोकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. १९३१ साली मा. दीनानाथ मंगेशकर यांनी हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील ‘शतजन्म शोधताना, मर्मबंधातली ठेव ही, सुकतात ही जगी या.. अशी गाणी स्वतः दीनानाथांनी आपल्या गायकीने आणि संगीताने अजरामर केली आहेत.
.