नाईक , भुजबळ , राणे यांच्या मुलांनी हाती घेतला वेगळा झेंडा
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांनी आमदारकी लढविण्यासाठी आपल्या वडिलांच्या पक्षापेक्षा वेगळा झेंडा हाती घेत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे सत्तेच्या सोयीसाठी सर्वच राजकीय पक्षांनीही सर्व धरबंध सोडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .
नवी मुंबई मधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघात भाजपाने उमेदवारी जाहीर केली मात्र बेलापूर मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असणाऱ्या आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या संदीप नाईक यांना ती नाकारण्यात आली, तिथे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली यामुळे संदीप नाईक यांनी थेट पदाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या हातात यावेळी तुतारी दिली. यामुळे शेजारच्या मतदारसंघातून वडील भाजपतून तर मुलगा तुतारी फुंकत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे खासदार म्हणून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले मात्र कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या निलेश राणे यांनी मात्र शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवत हातात धनुष्यबाण धरला आहे. तर वरिष्ठ मंत्री छगन भुजबळांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुंबई अध्यक्षपद पणाला लावून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी थेट उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाची मशाल हाती घेत आहेत.
यासोबतच अहील्यानगर जिल्ह्यातून आपल्या मुलालाही तिकीट मिळावे यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे काम सुरू ठेवले आहे तर याच जिल्ह्यातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी देखील फडणविसांची भेट घेत वेगळं राजकारण जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्तेच्या या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने सगळे धरबंध सोडल्याचे चित्र दिसत असून येनकेन प्रकारेण सत्ता मिळवण्यासाठी केवळ निवडून येण्याचा निकष हे ध्येय समोर ठेवत जो येईल त्याला उमेदवारी देण्याचे धोरण अवलंबिले आहे.
ML/ML/PGB
22 Oct 2024