संदीप देशपांडे हल्ला प्रकरण आता गुन्हे शाखेकडे

भांडूप, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भांडूप मधून दोघांना अटक केली आहे. अशोक खरात व किसन सोलंकी अशी या दोघांची नावे आहेत. खरात हा ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे . या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
मॉर्निंग वॉक करताना हल्ला
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना शुक्रवारी 3 मार्च रोजी चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला होता. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला.
त्यानंतर मुंबई पोलिसांकडूनही संदीप देशपांडेंवरील हल्ल्याची कसून चौकशी केली जात होती. दादर पोलीस स्थानक, शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर नेमके कोण? हल्ल्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? यांसारख्या अनेक गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरु होता. तसेच, या घटनेतील संशयित आरोपी आणि संदीप देशपांडेंनी आरोपींचं जे वर्णन केलं, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशी
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं होतं .Sandeep Deshpande attack case now with crime branch
तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक
मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपासाची चक्र फिरवून आरोपींचा शोध सुरू केला. या तपासासाठी 8 जणांच्या विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने भांडूपच्या कोकणनगर भागातून
अशोक खरात व त्याचा सहकारी किसन सोलंकी या दोघांना अटक करण्यात आली.
यातील अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत,असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ML/KA/PGB
4 Mar. 2023