वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी कांद्यापासून साकारले सांताचे चित्र

भुवनेश्वर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात आज नाताळ सण उत्साहाने साजरा होत आहे. शहरांतील दुकाने आणि मॉल्स ख्रिस्मससाठीच्या रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.साताक्लोजकडून गिफ्ट्स मिळवण्यासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे.अशा उत्साही वातावरणात ओडिशा येतील वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 100 फूट उंच सांताक्लॉज मनमोहक चित्र साकारून जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे ओडिशातील पुरी किनाऱ्यावर साकारलेले हे चित्र 2 टन कांदा आणि वाळूपासून साकारले आहे.
सुदर्शन पटनायक यांनी ख्रिसमसनिमित्त दोन टन कांदे वापरून “गिफ्ट अ प्लांट ग्रीन द अर्थ” या संदेशासह हे चित्र रेखाटले आहे. सुदर्शन पटनायक यांना याबद्दल प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. कांदे, वाळू आणि काही झाडे लावून त्यांनी एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. वाळूत १०० फूट लांब, २० फूट उंच आणि ४० फूट रुंद हे सुंदर शिल्प रेखाटले आहे. हे शिल्प पूर्ण करण्यासाठी सुदर्शन पटनायक यांना विद्यार्थ्यांनीसुद्धा मदत केली आहे, असे त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे. पटनायक यांच्या टीमने हे शिल्प 24 तासांत तयार केले आहे.
पटनायक म्हणाले- वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने कांदा आणि वाळूपासून बनविलेले जगातील सर्वात मोठे कलाकृती म्हणून वर्णन केले आहे. आपण दरवर्षी काहीतरी नवीन करतो. गेल्या वर्षी टोमॅटोपासून सांताक्लॉज बनवला होता. कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पटनायक यांना २०१४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
SL/KA/SL
25 Dec. 2023