ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार, नदी नाल्याना महापूर….

छ. संभाजीनगर दि १५– जिल्ह्यात पावसाने शनिवारी दिवसभर अधूनमधून रिमझिम व रात्रीतून दमदार हजेरी लावत २०० गावांत पाणीच पाणी केले. पैठण तालुक्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार दिसला. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेदरम्यान १० मंडळांत अतिवृष्टी झाली असून, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिती पडल्या, पत्रे उडाली, तर काही घरांमध्ये पाणी शिरले. सौर विद्युत पंपाचे पॅनलही पडले.

खुलताबाद, कन्नड तालुक्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता. या दमदार पावसाने २०० गावांत पाणीच पाणी केले. पैठण तालुक्यात शनिवार सायंकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. नांदर, हर्षी, जायकवाडी, दादेगाव, बालानगर, ढोरकीन परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उसाचे पीक आडवे झाले. तर, कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांत पाणी साचले होते, मोसंबी बागेतही पाणी साचून झाडे कोसळली. खुलताबाद शहरात झालेल्या पावसामुळे ऊरूसातील भाविक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय झाली.
अशीच परिस्थिती गल्लेबोरगावातील आठवडी बाजारात पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी, ग्राहकांची तारांबळ उडाली. कन्नड तालुक्यात दोन दिवसांपासून रात्री पाऊस व दिवसा ऊन पडत असल्याने पिकांना फायदा होत आहे. तर, सोयगावात सततच्या पावसामुळे पिके हातची जात आहेत.ML/ML/MS