संभाजी भिडेंचे महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य

 संभाजी भिडेंचे महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य

अमरावती, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

“महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत,” असे अत्यंत वादग्रस्त वक्‍तव्‍य करून श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत गुरुवारी रात्री अमरावतीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यभर चांगलाच वाद पेटला आहे.विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाही याचे पडसाद उमटले. संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल काही अनुद्गार काढले त्यांच्यावर तातडीने कारवाई करा अशी मागणी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली , यावर विरोधी सदस्य संतप्त झाले होते, आधी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलं .

भिडेंचे वादग्रस्त मुद्दे

अमरावतीतील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत वादग्रस्त असे दावे केले. भिडे म्‍हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.

संभाजी भिडे म्हणाले, महात्मा गांधींच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहे. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधीजींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील आहे, असा दावाही संभाजी भिडे यांनी केला.

हिंदुत्वावर भाष्य
कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हिंदुत्वावरदेखील भाष्य केले. संभाजी भिडे म्हणाले, जगाच्या पाठीवर हिंदुस्तान एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंची कीर्ती आणि शौर्य अफाट आहे. मात्र, सध्या हिंदू स्वतःच कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि धर्म विसरला आहे. त्यामुळे हिंदुस्थानाची आणि हिंदूंची अधोगती होत आहे. तसेच, देशामध्‍ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या कार्यक्रमाला भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे विरोध करण्यात आला होता. आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्‍यांनी अमरावतीत संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होऊ नये म्हणून आंदोलन केले. काही ठिकाणी पोस्‍टरही फाडण्‍यात आले होते.

SL/KA/SL

28 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *