संभाजी भिडे गुरुजींचा शिवसंग्रामकडून धिक्कार
मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडें गुरुजींचा आम्ही धिक्कार करीत असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. शिंदे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं जलपूजन करत कामाची सुरुवात केली होती. या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नसतानाच आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केला आहे. याशिवाय अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणं म्हणजे बेशरमपणा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भिडेंनी केलं आहे. त्याचा आम्ही धिक्कार करतो.
छत्रपती शिवाजी महाराजाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यासाठी शिंदे – ,फडणवीस सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी शिव संग्रामकडून लढा उभा केला जाईल असे सांगून ते म्हणाले शिवसंग्रामचे संस्थापक स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.
सध्या कोल्हापूर मध्ये सारथीचे कार्यालय आहे. सारथी संस्थेची व्याप्ती वाढवून सर्व विभागात हे कार्यालय सुरू करण्यात यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने थेट कर्ज योजना सुरु करावी व किमान १ लाख रुपयाचे कर्ज दयावे. त्यासाठी शासनाने येत्या अर्थसंकल्पामध्ये किमान ५०० कोटी रुपयांची तरतूद करून महामंडळास निधी उपलब्ध करून दयावा, शेतात बाराही महिने राबणाऱ्या ६५ वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन शासनाने द्यावी, भूमीपूत्राना योग्य न्याय देण्यासाठा स्थानिक भूमिपुत्रांना कारखान्यात कामाची हमी देण्यासाठी शासनाने योग्य ती कायदा करावा आणि महिलांना सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे,या मागण्यांसाठी शिवसंग्राम सरकारकडे प्रयत्न करणार आहे.
२०१४ पासून शिवसंग्राम भाजपा सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार आहे. शिवसंग्राम प्रणीत स्थापन असलेला “भारतीय संग्राम परिषद या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढविल्या जातील असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
SW/KA/SL
3 Feb. 2023