रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात सलमानची विशेष भूमिका
मुंबई, दि. ५ : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित करत असलेल्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान महत्त्वपूर्ण भूमिका करणार असल्याची माहिती समोर येत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान आणि शूर योद्धे जीवा महाले (Jeeva Mahala) यांची भूमिका सलमान खान साकारणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान 7 नोव्हेंबर रोजी त्याचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. हा सीन चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक क्षणांपैकी एक असण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार असलेल्या जीवा महाले यांनी अफजल खानचा विश्वासू साथीदार सय्यद बंडा याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून महाराजांचे प्राण वाचवले होते. हा पराक्रमाचा आणि त्यागाचा क्षण चित्रपटातील महत्त्वाचा भाग असेल. सलमान खान जीवा महाले यांच्या भूमिकेत आणि संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते हे चार मराठी अभिनेते यात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबतच अभिषेक बच्चन, भाग्यश्री, फरदीन खान आणि जिनिलिया देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
सलमान खान आणि रितेश देशमुख यांचे संबंध चांगले आहेत. यापूर्वीही सलमानने रितेशच्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात कॅमिओ केला होता, तसेच ‘वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय’ गाण्यातही तो दिसला होता. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा भव्य स्तरावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा 6 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
SL/ML/SL