मराठा समाजाच्या एकतेला सलाम, सलीम सारंग
मुंबई, दि ४
मराठा समाजाने आपल्या संघटित बळावर आणि एकीच्या जोरावर आरक्षण मिळवून दाखवले — त्यांचे मनापासून अभिनंदन! हे त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे आणि सामाजिक जागृतीचे फलित आहे.
पण आज एक गंभीर प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे — जर केवळ ४ टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकते, तर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणासाठी मंजूर केलेले ५ टक्के आरक्षण १४ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजासाठी का लागू केले जात नाही?
हे दु:खद वास्तव आहे की मुस्लिम समाजाकडे आज प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे. समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा, शासन दरबारी ठामपणे आवाज उठवणारा नेता आज दिसत नाही. अनेक मुस्लिम नेते केवळ स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहेत — आणि याच निष्क्रियतेमुळे समाज आजही मागास राहतो आहे.
मुस्लिम समाज कोणतीही विशेष मुभा मागत नाही — तो केवळ न्यायालयाने मान्यता दिलेले, शिक्षणातील आरक्षण मागत आहे. हे आरक्षण लागू करण्यात राज्य सरकारने आता दिरंगाई करू नये. हा समाजाचा हक्क आहे, कृपा नव्हे.
आता वेळ आली आहे — मुस्लिम समाजाने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची. नेतृत्व निर्माण करण्याची. आणि स्पष्ट संदेश देण्याची की आम्ही मागास नाही, पण आम्हाला मागास ठेवले जात आहे.KK/ML/MS