मुस्लीम समाजाला शिक्षण, सुरक्षा आणि सन्मान मिळावा: सलीम सारंग

मुंबई: दि २९
मुस्लिम समाजाला शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाने प्रतिकात्मक राजकारणाच्या मर्यादा ओलांडून मुख्य प्रवाहात प्रभाव निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी व्यक्त केले.
मुस्लीम समाजाकडे सर्व पक्षांनी संघटित मतपेढी म्हणून पाहिले. मात्र, समाजाची प्रगती आणि सुरक्षितता याकडे सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष आणि नेते यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी समाजाने संघटित होऊन जनआंदोलन उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सारंग यांनी केले.
सामाजिक सुरक्षिततेचा अभाव, शिक्षणाचा अभाव, आरक्षण आणि समान संधींचा अभाव या महाराष्ट्रातील आणि देशभरातील मुस्लीम समाजाच्या मुख्य समस्या आहेत, अशी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची धारणा आहे, असे सारंग यांनी नमूद केले. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी कायदेशीर तरतूद असणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सध्या देश, विदेशातील घडामोडींवर प्रतिक्रिया उमटत आहेत. आंदोलनेही होत आहेत. मात्र, झुंडबळी ( मॉब लिचिंग), धार्मिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. याबाबत मुस्लिम समाजातील नेते मूग गिळून गप्प आहेत. मुस्लिम समाजातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. नागरी सुविधांच्या अभावाने समाज विपरीत परिस्थितीला सामोरा जात आहे. यासाठी मात्र कोणी रस्त्यावर उतरताना दिसत नाही, अशी खंत सारंग यांनी व्यक्त केली.
मुस्लिम समाजाला सामाजिक सुरक्षितता प्राप्त व्हावी यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या धर्तीवर सशक्त कायद्याची आवश्यकता आहे. असा कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झुंडबळी आणि धार्मिक विद्वेषाला आळा बसणार नाही, असेही सारंग यांनी नमूद केले.
राजकीय पक्षांकडून समाजातील सुशिक्षित, सक्षम आणि विधायक दृष्टिकोन असलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वाला डावलून घराणेशाहीतून पुढे आलेल्या निष्क्रिय आणि कर्तृत्वशून्य नेत्यांना बळ दिले जाते. विधानसभा आणि विधान परिषदेत प्रस्थापित पक्षांकडून निवडून गेलेल्या मुस्लिम नेत्यांकडून समाजाच्या अडचणींना वाचा फोडण्याऐवजी निष्क्रिय भूमिका घेतली जाते, अशी टीकाही सारंग यांनी केली.
समाजाची प्रगती घडवून आणायची असेल तर प्रस्थापित नेतृत्व निरुपयोगी आहे. नव्या विचारांचे, नवाज दृष्टिकोन असणारे, ऊर्जावान नेतृत्व समाजातून पुढे येणे आवश्यक आहे. सध्याचा काळ हा केवळ घोषणाबाजीचा काळ नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा काळ आहे. समाजाची प्रगती साधण्यासाठी शिक्षण हे जनआंदोलन म्हणून हाती घेतले पाहिजे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मुस्लिम महिला आणि युवक यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन देखील सलीम सारंग यांनी केले.KK/ML/MS