बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व SIR मुळे एनडीएचा विजय

 बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व SIR मुळे एनडीएचा विजय

मुंबई, दि. १४ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव जितेंद्र बघेल, सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक, राजेंद्र राख, सरचिटणीस दादासाहेब मुंडे, रामहरी रुपनवर, शाह आलम शेख, पल्लवी रेणके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर प्रसार माध्य़मांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी जे आरोप करत आहेत त्यात काहीही सत्य नाही ते निराधार आहेत. पाच वर्ष गरिब जनतेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलेले १० हजार रुपये याचाही परिणाम झाला का, यावर चर्चा होईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे हे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. देशाला आता टी. एन. शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातीकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. लहान घटकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढवा. काँग्रेस व राज्यघटनेचा विचार एकच आहे, हा विचार समतेचा आहे आणि आपल्या संत महंतानी जे सांगतिले तेच राज्य घटनेत आहे. देश सध्या एका संकटातून जात असून जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जाते. आज राहुल गांधी देश, लोकशाही व राज्यघटना वाचवण्याची लढाई लढत आहेत या लढाईत सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन थोरात यांनी केले.

या पदग्रहण सोहळ्यात बोलताना ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयहिंद म्हणाले की, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संत, महापुरुष, वारकरी संप्रदायाची भूमी आहे. सामाजीक न्यायाचा मार्ग महाराष्ट्राने देशाला दाखवून दिला आहे. आज राहुल गांधी हे सामाजिक न्यायाची लढाई लढत आहेत. देशातील ९० टक्के जनतेकडे सत्तेतील भागिदारी सर्वात कमी असून मूठभर लोकांच्या हातात सत्तेची भागिदारी आहे. हे चित्र आपल्याला बदलावे लागणार आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठीच लढत आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. यशपाल भिंगे यावेळी म्हणाले की, भाजपा व आरएसएसने ओबीसी समाजाचा आवाज दडपला आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा हाच मनुवादी विचार आहे. आजही भाजपा सरकारमध्ये ओबीसींचा आवाज दडपला जात आहे. लोकशाही विरोधातील अपप्रवृत्तींच्या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याची गरज असून जशास तसे उत्तर दिले जाईल असे सांगून २०२९ साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा असेल यासाठी काम करू असे डॉ. यशपाल भिंगे म्हणाले. यावेळी यशपाल भिंगे यांनी ओबीसीचा अध्यक्ष म्हणून पुढील वर्षभरात काय करणार याचा संकल्प हर्षवर्धन सपकाळ व अनिल जयहिंद यांना सादर केला.

गिरीजा पिचड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची नात गिरीजा पिचड यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. गिरीजा पिचड यांच्या रुपाने आदिवासी समाजाला एक नेतृत्व मिळाले असून त्या आदिवासी समाजाच्या न्याय हक्काची लढाई लढतील, असे सपकाळ यावेळी म्हणाले…

नेहरु जयंती निमित्त ‘शिदोरी’च्या विशेषांकाचे प्रकाशन..

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘शिदोरी’च्या विशेष अंकाचे प्रकाशन आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *