भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जाहीर केली निवृत्ती
मुंबई, दि. २० : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून आपली निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही वर्षांपासून ती सतत दुखापतींशी झुंज देत होती. विशेषतः गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि संधीवाताच्या (arthritis) समस्येमुळे ती पूर्वीसारखा दीर्घ सराव करू शकत नव्हती. अखेर या शारीरिक अडचणींमुळे तिने बॅडमिंटन कोर्टला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे भारतीय क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली असून एका सुवर्णयुगाचा शेवट झाला आहे.
सायना नेहवाल ही भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे जिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ब्राँझपदक मिळवून भारतीय बॅडमिंटनला जागतिक पातळीवर नवा दर्जा दिला. तिने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई स्पर्धा आणि सुपर सिरीज स्पर्धांमध्येही तिने अनेक पदके जिंकली आहेत.
तिच्या कारकिर्दीत सायनाने २४ आंतरराष्ट्रीय किताब जिंकले. २०१५ मध्ये ती जगातील क्रमांक १ महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. तिच्या यशामुळे भारतात बॅडमिंटनला नवा उभारी मिळाली आणि पी.व्ही. सिंधूसारख्या नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळाली.
निवृत्तीची घोषणा करताना सायनाने सांगितले की, “आता ८-९ तासांचा सराव करणे शक्य नाही. दुखापतींमुळे शरीर साथ देत नाही. पण माझ्या कारकिर्दीत मिळालेल्या यशाचा मला अभिमान आहे. भारतीय बॅडमिंटनला दिलेल्या योगदानामुळे मी समाधानी आहे.”
सायनाच्या निवृत्तीने भारतीय क्रीडा विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तिच्या खेळातील जिद्द, आक्रमकता आणि सातत्यामुळे ती लाखो चाहत्यांच्या मनात कायमची घर करून राहिली आहे.
SL/ML/SL