सैफची 15 हजार कोटींची संपत्ती होणार जप्त

 सैफची 15 हजार कोटींची संपत्ती होणार जप्त

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर शस्त्रक्रीयेनंतर तो रुग्णालयातून घरी परतला असतानाच त्याच्यावर आणखी एक संकट कोसळले आहे. भोपाळ येथील त्याची 100 एकरवर पसरलेली वडिलोपार्जित जमीन आणि महाल राज्य सरकार जप्त करणार आहे. या मालमत्तेची किंमत अंदाजे 15 हजार कोटी इतकी आहे. सैफ अली खान याचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे हरियाणातील पतौडी गावातील आहेत. तेथे त्यांचा अत्यंत प्रशस्त असा महाल आहे. सैफ अली खान याला आईच्या नात्यातूनही प्रचंड संपत्ती मिळाली आहे. ही सर्व संपत्ती भोपाळ शहरात आहे. भोपाळ शहरातच 100 एकरवर त्यांचा आणखी एक महाल आणि जमीन आहे. हीच संपत्ती राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. विशेष म्हणजे ‘शत्रू संपत्ती’ कायद्यांतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.

सैफ अली खानचे वडील मन्सुर पतौडी यांचे वडील इफ्तिखार हेही त्यांच्या काळात क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी भोपाळचे शेवटचे नवाब हमिदुल्ला खान यांची दुसरी कन्या बेगम सजिदा सुलतान यांच्याशी विवाह केला. हमिदुल्ला खान यांची थोरली मुलगी अबिदा सुलतान ही त्यांच्या संपत्तीची वारस झाली. पण फाळणी झाल्यानंतर ती पाकिस्तानात निघून गेली. यामुळे तिच्या मालकीची भोपाळ येथील जमीन व महाल ही ‘शत्रू संपत्ती’ मानली गेली.

शत्रू संपत्ती कायद्यानुसार पाकिस्तानात निघून गेलेल्या भारतीयांची संपत्ती सरकार जप्त करू शकते. या कायद्यानुसार ही संपत्ती जप्त करण्याबाबत मध्य प्रदेश सरकारने न्यायालयात अर्ज दाखल केला. यावेळी सैफ अली खानच्या कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली आणि या संपत्तीवर दावा सांगितला. हा दावा फेटाळला गेला असला तरी कारवाईबाबत न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती नुकतीच उठविण्यात आली. उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि अपिलीय प्राधिकरणासमोर बाजू मांडण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली. ही मुदत आता संपली असून, पतौडी कुटुंबाने या काळात कोणतीही हालचाल केली नाही. यामुळे आता मध्य प्रदेश सरकार ही संपत्ती जप्त करू शकते. ही संपत्ती वाचवायची असेल तर खंडपीठाकडे अपिल करण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे.

ML/ML/SL

22 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *