साईबाबांचे दर्शन आता मास्क घालूनच
अहमदनगर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता मास्क असेल तरच साईंचे दर्शन मिळेल, त्यासाठी शिर्डी संस्थानाने याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थानला दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आता अनेक ठिकाणी सुरू झाला आहे.
योग्य पद्धतीने काळजी घेण्याची सूचना प्रशासकीय पातळी करण्यात आलेल्या आहे, पण दुसरीकडे सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे आणि पर्यटनाच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी आता मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र सुरू झाली आहे.
सध्या सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 31 डिसेंबर रोजी साईदर्शन खुले ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे. सध्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लाखो भाविक रोज दर्शन रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेत आहेत तर अशीच गर्दी प्रसाद घेण्यासाठी साईप्रसाद या ठिकाणी होत आहे.
येणारे भाविक हे राज्यासह परराज्यातील आहेत. काहीजण स्वतःहून मास्क लावत आहेत तर काहींकडे मास्क नाही अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. आगामी काळामध्ये ही गर्दी अधिक प्रमाणामध्ये वाढत जाईल अशी सुद्धा शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे नियोजन याठिकाणी सुरू आहे. सलग सुट्ट्यांमुळे दिवसेंदिवस या ठिकाणी गर्दी वाढत चाललेली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या विषयाकडे विखे यांनी लक्ष वेधले. शिर्डी संस्थानने आता सर्व भाविकांना मास्क सक्ती करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ज्यांच्याकडे मास्क नाही, त्यांना मास्क घालून येण्यास सांगावे वेळप्रसंगी देवस्थानाने सुद्धा मोफत मास्क भक्तांना उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी केल्या आहेत.
ML/KA/PGB 27 Dec 2023