आगळीवेगळी स्पर्धा, साहित्ययात्री 2023

डोंबिवली येथील ‘ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी’ ने रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील टिळक नगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात ‘साहित्ययात्री २०२३’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. वाचकांच्या मराठी साहित्यविषयक ज्ञानाचा कस पाहणारी ही प्रश्न मंजुषा होती. यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातील सहा स्पर्धक गटांनी सहभाग घेतला. सुमारे तीन तास चाललेल्या या स्पर्धेत, पुस्तकं, साहित्यिक, साहित्यिकांनी निर्मिलेली पात्र, मुखपृष्ठ, अर्पण पत्रिका, आत्मचरित्र, कविता अशा साहित्याच्या विविध अंगांचा धांडोळा घेणाऱ्या एकूण १२ फेऱ्या पार पडल्या.
त्यामधून वि. स. खांडेकर संघ आणि कुसुमाग्रज संघ यांनी चुरशीची लढत देत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. डोंबिवली मधील ज्येष्ठ गझलकार जयंत कुलकर्णी या कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा स्पर्धांची आणि त्यांच्या प्रसाराची गरज त्यांनी अधोरेखित केली. रसिक वाचक आणि लेखक गणेश कुलकर्णी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. वाचनातला आनंद आणि त्यामधून येणारी समृद्धता त्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून प्रस्तुत करत स्पर्धकांना शाबासकी दिली. या स्पर्धेला डोंबिवलीकर रसिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला.या आधी संस्थेतर्फे २०१९ मध्ये डोंबिवलीत तर मंत्रालयातील कर्मचारी – अधिकारी वर्गासाठी २०२१ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी २०१९ पासून डोंबिवली मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासोबतच ग्रामीण भागातील एकल उत्पादकांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या हेतूने ‘रयतपेठ’ या उपक्रमाचेही आयोजन करते. या वर्षी हा उपक्रम ४ आणि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वेश सभागृह डोंबिवली येथे आयोजित केली आहे. वाचकांसाठी आजवर सलग २३८ आठवडे शब्दांगण हा उपक्रम संस्थेमार्फत चालविला जात आहे. ही निःशुल्क सत्रे दर गुरुवारी संध्याकाळी आयोजित केली जातात ज्यामध्ये आजपर्यंत विद्यार्थ्यांबरोबरच अनेक मान्यवर वक्त्यांनी सादरीकरण केलेले आहे. संस्थेचे अध्यक्ष विनोद देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात अधिकाधिक लोकांनी सदर उपक्रमास जोडले जाण्याचे आवाहन केले.सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचा एक मानबिंदू ठरलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेविषयी व संस्थेच्या इतर उपक्रमांविषयी अधिक माहिती संस्थेच्या या https://www.facebook.com/profile.php?id=100067233258998&mibextid=ZbWKwL फेसबुक पेजवर मिळू शकेल.
ML/KA/PGB 5 Sep 2023