साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, हे आहेत पुरस्कार विजेते मराठी लेखक
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य क्षेत्रात मानाचे पुरस्कार समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी आज पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्यामध्ये रुची असणाऱ्या आणि साहित्याची आवड असणाऱ्यांना या पुरस्काराची विशेष उत्सुकता असते. यंदाच्या वर्षी मराठी साहित्याक्षेत्रातूनही युवा आणि बाल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्यिकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये (1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 ) या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.
मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.)विलास पाटिल यांचा समावेश होता.
देशपातळीवर ज्या पुरस्कारांचा गौरव केला जातो आणि ज्या पुरस्कारांची साहित्यिक,समीक्षक, वाचक आतूरतेनं वाट पाहत असतात अशा साहित्य पुरस्कारांची घोषणा होताच साहित्य वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हिंदीमध्ये अतुल कुमार यांच्या चांदपूर की चंद्राला तर इंग्रजीमध्ये अनिरुद्ध कानिसेट्टी यांच्या लॉर्डस ऑफ द डेक्कन- सदर्न इंडिया फ्रॉम द चालुक्याज टू ज चोलाज या पुस्तकाला पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.
याशिवाय पंजाबी साहित्यामध्ये संदीप यांच्या चित्त दा जुगराफिया यांच्या तर उर्दूमध्ये तौसिफ बरेलवी यांच्या जहन जाह या कथासंग्रहाला पुरस्कार जाहिर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारी मंडळानं या युवा पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात २० युवा लेखकांची निवड करण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी ओडिसी भाषेतील पुरस्कारांची निवड करण्यात आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून साहित्य क्षेत्रातील या प्रसिद्ध पुरस्कारांची चर्चा होती. त्यात संस्कृत, मैथिली आणि मणिपूरी भाषा वगळता सर्वच भाषांमधील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
SL/KA/SL
23 June 2023