सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह राज्यात निर्माण करूया
मुंबई दि १४ – सहकाराची ताकद काय आहे, संघटन आणि ताकद ज्यावेळी दिसते त्याचवेळेला सरकार, यंत्रणा ही आपल्या प्रश्नांकडे बघत असते. तशा प्रकारची सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण करूया असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई आयोजित सहकार स्नेहसंमेलन व पतसंस्था परिवार मासिक रौप्य महोत्सवी स्मरणिका प्रकाशन सोहळ्या दरम्यान केले.
याप्रसंगी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, विठ्ठल भोसले, बँकिंग सल्लागार प्रमोद कर्नाड, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मानद सचिव रामदास मोरे, बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ मोरे, शिवसह्याद्री सहकारी पतपेढीचे अध्यक्ष भाई वांगडे, महाराष्ट्र राज्य शिवसेना सहकार सेनेच्या प्रदेश अध्यक्षा आशा मामिडी यांसह मुंबई बँकेचे सर्व संचालक व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, सहकारात काम करताना केवळ बोलून चालत नाही. सहकारात काही द्यायची वेळ येते तेव्हा राजकारणाची गोळा बेरीज केली जाते. पण मी सहकारात काम करताना कधीच राजकारण केले नाही. कोण कुठल्या जातीचा, पक्षाचा आहे यापेक्षा सहकाराला ताकद कोण देऊ शकतो हे महत्वाचे आहे. ज्यावेळी सभासदांवर विश्वास असतो तेव्हा कुठलीही ताकद आपल्याला पराभूत करू शकत नाही याची अनुभूती मी घेतली असून २५ वर्ष मुंबई बँकेत काम करतोय. बाराशे कोटींची बँक पंधरा हजार कोटींवर नेली असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
दरेकर पुढे म्हणाले कि, सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सहकारासाठी छातीची ढाल करून या राज्यातील मुंबईतील सहकार वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्यासाठी काम करणार आहे. विश्वास हा असाच नाही तर कामातून, कृतीतून निर्माण होत असतो. आम्ही संवेदना जपणारे सहकारातील कार्यकर्ते आहोत. गिरणी कामगार, माथाडी कामगार, पोलीस, शिक्षक यांना कर्ज देण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे. पतसंस्थांचे मोठे स्थान सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी आहे. तुमची वसुली प्राधिकरण निर्माण करण्याची मागणी आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारकडे मागणी करणार असून सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळवू, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
१५ वर्षाच्या तपानंतर स्वयंपुनर्विकास प्राधिकरण निर्माण
दरेकर म्हणाले कि, १५ वर्षाच्या तपानंतर स्वयंपुनर्विकास प्राधिकरण निर्माण झाले. या योजनेसाठी मुंबई बँकेमार्फत कर्ज धोरण आणले. मुख्यमंत्री यांनी राजाश्रय दिला. ३-४ इमारती उभ्या केल्या. त्यानंतर स्वयं पुनर्विकासाचे वारे संपूर्ण मुंबईत सुरु झाले. गोरेगावला गृहनिर्माण परिषद घेतली. त्या परिषदेत सरकारकडे १८ मागण्या केल्या. त्यापैकी १६ शासन निर्णय तात्काळ निघाले. चारकोप येथील चावी वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची घोषणा केली. सर्वसामान्यांच्या घराचे जे स्वप्न होते ते सत्यात उतरले. ही सहकाराची ताकद आहे. एक जिल्हा बँक सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल घडवू शकते हे करून दाखवले.
सहकाराला मार्गदर्शन देण्याची गरज
दरेकर म्हणाले कि, सहकाराला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन देण्याची गरज आहे. सहकारातील व्यवहार सहकारात करा. मोठे नेटवर्क असूनही आपण संघटित नाही. आपल्या बँका सक्षम करायच्या असतील तर आपले पैसे सहकारातच राहायला हवेत. एकमेकांस सहाय्य करू हे सांगण्यासाठी नाही तर सहकारातील कार्यकर्त्यांनी कृतीतून करण्याची गरज असल्याचेही दरेकर म्हणाले.
पतसंस्था परिवार हे मासिक महाराष्ट्रभर पसरवा
दरेकर म्हणाले कि, पतसंस्था परिवार चालविताना आर्थिक यातना काय असतील हे मला माहित आहे. सलग २५ वर्ष एका तपस्वी प्रमाणे सहकारावर लिहिणे, पतसंस्थांच्या हिताची बाजू मांडणे, आपले असो वा विरोधकांचे सरकारच्या धोरणांवर टीका करणे, सहकार जपला पाहिजे, जगला पाहिजे ही भावना मानणारे शिवाजी नलावडे आहेत. मुंबईचे पतसंस्था परिवार मासिक महाराष्ट्रभर जर पसरवलात तर येणाऱ्या काळात सहकाराचे मुखपत्र म्हणून पतसंस्था परिवार ओळखले जाईल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.ML/ML/MS