असंघटित कामगारांना समान काम समान दाम! सचिन अहिर

मुंबई, दि २१
आज केवळ ३ टक्के कामगार संघटित आहेत,तर ९७ टक्के कामगार असंघटित आहेत.त्यात अधिकांश कंत्राटी कामगार आहेत.त्यांना ग्रॅच्युइटी,प्रा.फंडा सारख्या कोणत्याही सामाजिक सुरक्षित सेवा लागू नाहीत.त्यांना किमान वेतनही धड मिळत नाही,त्यांच्यासाठी आता समान काम समान वेतन या मागणीचा लढा घेऊन पुढे जावे लागेल,अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर येथे दिली.
आमदार सचिन अहिर नेतृत्व करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा शेवट, पुण्याच्या चाकण
औद्योगिकपट्यातील श्रेया लॉन्स मंगल कार्यालयातील भव्य कामगार मेळाव्याने संपन्न झाला. जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे उद्योग आणि व्यवसायाचे नेतृत्व करीत असलेले महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ,ऑल इंडिया भारतीय कामगारसेना महासंघाशी संलग्न आहे.सुमारे ३० हजार कामगार युनियनचे सदस्य आहेत.त्या मधील यूनिनचे प्रतिनिधी कार्यकर्ते
मेळाव्याला
उपस्थित होते.चाकण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर होते.प्रारंभी विभागीय (ठाकरे) शिवसेनेचे आमदार
बाबाजी काळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन पार पडले.संटनेने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक शहरा बरोबरच गुजरातच्या सोनगड पर्यंत युनियनची व्याप्ती वाढविली आहे,त्याबद्दल आमदार बाबाजी काळे यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात नेतृत्वाचा गुणगौरव केला.
सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, उद्योग टिकला तर कामगार जगेल आणि कामगार जगला तर युनियन पुढे जाईल,हे तत्व घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत.पण आज संघटना वाढविण्यापेक्षा ती टिकविणे अधिक कसोटीचे ठारले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन चार कामगार संहिता आणि राज्य सरकारने हुकुमशाही पध्दतीने जनसुरक्षा कायद्याचे उंचललेले पाऊल कामगार वर्गाला घातक ठरणारे आहे,असे सांगून सचिन अहिर यांनी याविरुद्ध संघटितपणे लढावे लागेल,असे आवाहन केले.
तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकात सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी “कुठे गेल्या दोन कोटी बेरोजगार युवकांसाठीच्या नोक-या?असा संतप्त सवाल करुन,सरकारी नोकर-यांमध्ये,नव्या कामगार कायद्या अंतर्गत “फिक्सटर्म” धोरण अवलंबिले आहे,ते सुशिक्षित नोकदारांचे भविष्य अंध:कारमय करणारे आहे, असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना लढाऊ कामगार नेते विश्वास उटगी यांनी, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नवीन चार कामगार संहितेवर तसेच लोकशाही विरोधी,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणा-या जनसुरक्षा विधेयकावर जोरदार टीका केली. माजी सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी काकडे यांनी आपल्या भाषणात, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार कायद्यांचा आढावा घेऊन,आजची कामगार चळवळ उद्याचे उज्वल भविष्य आहे,असे सांगितले.
पहिल्या दिवसाच्या कार्यकारीणीत चर्चिले गेलेले ठराव १)नवीन चार कामगार संहिता आणि २) जन सुरक्षा विधेयक मागे घ्या!३) ग्रॅज्युईटी कायद्यात बदल करा! ४) कंत्राटी कायद्यात सुधारणा करा!५) कामगारांसाठी कुटुंब कल्याण योजना राबवा ६) युनियनमध्ये महिला आरक्षण आवलंबण्यात यावे यासारखे ठराव प्रतिनिधी मेळाव्यात संमत करण्यात आले.सर्वश्री विजय काळोखे,सुनिल (लाली) अहिर, इश्वर वाघ,उत्तम गिते, मिलिंद तांबडे,संदेश कदम,किशोर रहाटे,आदीं पदाधिका-यांनी ठराव मांडले. तर कार्यकारीणीत निवृत्ती देसाई, राजन लाड,जी.बी.गावडे, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,’शिवाजी काळे,अवधेश पांडे,साई निकम, विश्वनाथ सावंत, ऍड.नितीन पाटील,बाळा सावर्डेकर, दीपक यादव, संतोष बैलमारे,कु.ऐश्वर्या सचिन अहीर आदींची ठरावावर भाषणे झाली.
अधिवेशनात ओला-उबेरचे ज्वलंत प्रश्न, कामगार करार प्रशिक्षण,सामाजिक चळवळ आदी बाबींवर चर्चा झाली. KK/ML/MS