*फोर लेबर कोडचे भूत आता कायमची अध्यापार करावे लागेल
सचिन आहीर
मुंबई, दि २८
शंभर वर्षांपूर्वीच्या लढ्यातून मिळविलेले २९ कामगार कायदे निर्दयीपणे पायदळी तुडवून,राक्षसी आणि हुकुमशाही पध्दतीने चार कामगार संहिता सर्व राज्यांना लागू करणा-या भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुन्हा सर्व कामगार संघटनांना रस्त्यावर उतरावे लागेत,अशा कठोर शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी नवीन कामगार संहितेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.
देशातील कोट्यवधी कामगार वर्गाच्या मानगुटीवर बसविणा-या चार कामगार संहिता केंद्र सरकारने अलीकडेच लागू केल्या असून त्यातून कामगार वर्गात खळबळ उडाली आहे.
अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी म्हटले आहे, मालकशाहीवर धाक निर्माण करणा-या संपासारख्या धारधार लढाऊ शस्त्राला आता यापुढे तिलांजली द्यावी लागणार असून मजुर वर्गाला करोडपतींचे लांगूलचालन करावे लागणार आहे.
खरंम्हणजे नवीन संहितेत कामगाराच्या श्रमाचे व बुद्धीचे मूल्यमापन नाही.त्यामुळे त्यांना आत्मसन्मान मिळणे कठीण आहे. नव्या संहितेत फिक्सटर्म एम्प्लॉयमेंट असूनही नोकरीची शाश्वती नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती आहे.
कामगार संघटनांच्या नोंदणी संदर्भात सर्व अधिकार मालकांना दिलेले आहेत. त्यामुळे मालक आपल्या मर्जीनुरू निर्णय घेणार आहेत. ज्यामध्ये असंघटित कामगार आहेत,ते आपल्या हक्कासाठी कोणाकडे दाद मागणार? त्यामुळे कामगार वर्गावर अन्याय होत राहणार आहेत.
नवीन कामगार संहिते(लेबर कोड) मुळे कामगारांना मोठाच फायदा होईल,असे सरकार हाकाट्या पिटत आहे.एवढा या संहितेवर विश्वास होता,तर मग त्या लागू होण्यापूर्वी १२ केंद्रीय कामगार संघटनांनी आपल्याला विश्वासात घेण्यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी केली होती,ती मागणी पूर्ण का केली गेली नाही? यापूर्वीच्या सरकारांनी कामगार कायद्यात बदल करताना कामगार संघटनांना विश्वासात घेतले होते.त्यामुळे कामगार वर्गाचा यावर विश्वास राहिलेला नाही.
संसदेत बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर करून, राज्यसभेमध्ये मागील दरवाजाने, हे बिल संमत करण्यात आले, असे म्हटले जाते. महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करताना राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने सर्वात आधी वांद्रे येथील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन आवाज उठविला आहे, याची आठवण करून देऊन आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे,नव्या संहितेतील सुधारणा कामगारांना मारक आणि मालकांना तारक आहेत.नवीन सुधारणा कॉर्पोरेटधार्जिण्या परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या आहेत,असा सर्व कामगार संघटनांकडून आरोप होत असतांना, त्यावर सरकारने समर्पक उत्तर दिलेले नाही. तेव्हा सर्व कामगार संघटनांना एकत्र येऊन आताच या विरुद्ध आवाज उठवावा लागेल,नाहीतर भविष्यात उद्योगधंद्यात नव्याने येणारा युवा कामगार आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन हानिकारक कामगार संहिता हाणून पाडाव्यात. KK/ML/MS