कॅन्सरवर लस शोधल्याचा रशियातील मेडिकल एजन्सीचा दावा

मॉस्को, रशिया, दि. ८ : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी रशियाने एक मोठा पाऊल उचलले आहे. रशियातील फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) ने कॅन्सरवर प्रभावी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ही लस 2025 पासून रुग्णांवर वापरण्यासाठी तयार असून, सुरुवातीला ती कोलोरेक्टल कर्करोग (मोठ्या आतड्यांचा कर्करोग) यावर उपचारासाठी वापरली जाणार आहे.
ही लस mRNA-बेस्ड असून, तिच्या सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्याचे FMBAच्या प्रमुख वेरॉनिका स्क्वार्त्सोवा यांनी जाहीर केले. चाचण्यांमध्ये लसीमुळे ट्युमरचा आकार कमी होणे, वाढ थांबवणे, आणि रुग्णांच्या शरीरात सुरक्षिततेची पुष्टी झाली आहे.
लसीचा दुसरा प्रकार देखील विकसित केला जात आहे, जो ग्लिओब्लास्टोमा (मेंदूचा कर्करोग) आणि मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) यावर प्रभावी ठरेल.
मोफत लसीकरणाची घोषणा
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ही लस 2025 पासून देशातील सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांना मोफत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे महागड्या उपचारांपासून रुग्णांना दिलासा मिळेल आणि आरोग्य क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला जाईल.
जागतिक आरोग्य क्षेत्रात उत्सुकता
रशियाच्या या दाव्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या संशोधनाकडे वळले आहे. कर्करोगावरील लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देश करत आहेत, पण रशियाने केलेला दावा 100% प्रभावीतेचा असल्यामुळे तो विशेष महत्त्वाचा ठरतो.
FMBAच्या प्रमुख स्क्वार्त्सोवा म्हणतात:
“गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या लसीवर काम करत होतो. आता ती रुग्णांवर वापरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही केवळ अधिकृत मान्यतेच्या प्रतीक्षेत आहोत.” ही लस कर्करोगाविरुद्धच्या लढाईत एक आशेचा किरण ठरू शकते. मात्र, अंतिम परिणाम आणि जागतिक मान्यता मिळेपर्यंत वैद्यकीय समुदायाने संयम राखणे गरजेचे आहे.