महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

 महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई दि २१ : नाशिकमधील स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. काल २० मार्च रोजी चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि स्वेच्छेने पदत्याग करत असल्याचे नमूद केले आहे. चाकणकर यांची १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून अश्लील स्वरूपाच्या काही चित्रफितीही समोर आल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चाकणकर या खरात यांच्या संपर्कात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होत होती आणि राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. याच प्रकरणात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पीडितेच्या म्हणण्याचा हवाला देत चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही त्यांच्यावर टीका केली होती.

अशोक खरात याला लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे वाढत्या दबावात चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *