रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन काल करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99% जीवाणू, विषाणू यावर नियंत्रण मिळविते. इस्रायलच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आधीच यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले आहे. पेंटमध्ये समाविष्ट केलेले QUACTIV™ हे तंत्रज्ञान पेंट जोपर्यंत भिंतींवर राहते तोपर्यंत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून सतत संरक्षण देते. हे पेंट आणि तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणासह पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित आहे.
कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यावेळी म्हणाले की “जेजे हॉस्पिटलमध्ये या प्रगत प्रतिजैविक आणीबाणी कक्षाचे होत असलेले उदघाटन हे इस्रायल आणि भारत यांच्यातील आरोग्य सेवेतील सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात रुग्णांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्यामध्ये हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इस्रायलचे मुंबईतील कौन्सुल जनरल कोबी शोशानी म्हणाले की, इजराइल आणि भारतामध्ये आरोग्य क्षेत्रातील देवाण-घेवाणसाठी होत असलेले सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील सहयोग यामुळे आणखी वृद्धिंगत होईल. वैद्यकीय सुविधांमध्ये बदल घडवून आणणारी ही झेप आहे. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रण यामध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा व्यापक परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबमुळे रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित होईल. “QUACTIV™ प्रतिजैविक पेंटची अंमलबजावणी हे जेजे रुग्णालयासाठी एक मोठे पाऊल आहे. हे तंत्रज्ञान आमच्या रुग्णांना संरक्षणाचा अतिरिक्त स्तर प्रदान करेल, जे संक्रमण रोखण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी आवश्यक आहे.”
नॅनोसोनोचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओरी बार चेम यांनी या नवोपक्रमाच्या व्यापक प्रभावाविषयी माहिती दिली. “QUACTIV™ हे तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे. भारतात त्याचा सकारात्मक प्रभाव पाहून आम्ही उत्साहित आहोत, असे त्यांनी सांगितले.
ML/ML/PGB
28 Aug 2024