महिला रोजगार योजना, ७५ लाख महिलांच्या खात्यावर १० हजार रुपये जमा
पटना, दि. २६ : बिहारच्या निवडणूका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षाकडून आता विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. बिहार सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत राज्यातील ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात थेट १० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील 75 लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट १० हजार रुपये म्हणजेच एकूण ७५०० कोटी रुपये हस्तांतरित केले. या नवीन योजनेनुसार, राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आर्थिक सहाय्य प्रदान करण्याची तरतूद आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना लघु उद्योग, स्वयंरोजगार, प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या निधीचा वापर महिला घरगुती व्यवसाय, हस्तकला, शेतीपूरक उद्योग किंवा इतर उपजीविकेच्या साधनांसाठी करू शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी स्वयं-सहायता गटात नोंदणी केलेली असावी आणि आधार व बँक खात्याशी लिंक असलेली माहिती अद्ययावत असावी.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात सांगितले, “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. या योजनेद्वारे महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार भविष्यात या योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
या योजनेमुळे राज्यातील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपल्या व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून सरकारकडून सातत्याने मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची मागणी केली आहे.