रिपब्लिकन पक्ष माझा सत्कार करतोय याचा आनंद
आ. प्रविण दरेकर

मुंबई, दि ६- मी आंबेडकर विचारांचा पाईक आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण झाल्यामुळे आंबेडकरी विचारांचा वेगळा पगडा माझ्यावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन शोषित, पीडित आणि वंचितांसाठी व्यतित केले. तो वारसा पुढे नेणाऱ्या रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष माझा सत्कार करतोय याचा आनंद होतोय. तसेच हा सत्कार तळागळातील लोकांसाठी नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करणारे उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते होतोय याचाही विशेष आनंद आहे, अशा भावना स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केल्या.
आमदार प्रविण दरेकर यांची स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने रिपब्लिकन पार्टी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने रविवारी दहिसर (पूर्व) येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आरपीआयचे सरचिटणीस गौतम सोनावणे, आरपीआयचे उत्तर मुंबईचे निरीक्षक कमलेश यादव, कार्यक्रमाचे आयोजक आणि आरपीआयचे उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, प्रमोद मोरे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, परशुराम नाईक, संदीप शिंदे, मधुकर गवई, तुळशीराम कांबळे, रोशन शेख यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, मला कुठलाही राजकीय वारसा, आर्थिक स्थिती नाही. एका खेड्यातून येऊन मुंबईसारख्या शहरात आपले अस्तित्व निर्माण करणे, अशा संघर्षातून मी इथपर्यंत पोचलो आहे. मला माझ्या स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास आहे. म्हणूनच मी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव असल्याचे दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो कि, ज्यावेळी मी स्वयंपुनर्विकास विषय आणला त्याला त्यांनी राजाश्रय दिला. गोरेगाव येथे गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. त्या परिषदेत स्वयंपुनर्विकासाबाबत वेगवेगळ्या १८ मागण्या केल्या. त्यापैकी १६ मागण्यांचे शासन निर्णय करून खऱ्या अर्थाने त्यांनी या चळवळीला गती दिली. मुंबईत १६ इमारती उभ्या राहिल्या असून लोकं मोठ्या घरात राहायला गेली आहेत. स्वयंपुनर्विकासाचे हे जाळे मुंबईभर पसरलेय. मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती जाहीर केली. त्या समितीने अभ्यास करून अडीच महिन्यातच आपला अहवाल सरकारला सादर केला. मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल स्वीकारला व प्राधिकरण केले. या प्राधिकरणाचा अध्यक्ष मला बनवले असून मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. त्यापेक्षा महत्वाचे मी ज्यांच्यासाठी ही लढाई लढतोय त्यांना न्याय देण्याची संधी देवाभाऊंनी मला दिली याचा आनंद असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले कि, स्वयंपुनर्विकास हा सतत चालणारा विषय आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत इमारती उभ्या राहणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या जमिनीवर असलेल्या इमारतींचा, गिरण्यांच्या बैठ्या चाळी, सफाई कामगारांच्या वसाहती, महसूलच्या जागेवर असलेल्या इमारती, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करू शकतो. समाजकल्याणची जागा घेऊन मागासवर्गीयांच्या सोसायट्या आहेत त्याचबरोबर खासगी जागेवर दोन मजल्याच्या चाळी आहेत त्यांच्याही पुनर्विकासाचा विषय माझ्या अहवालात नमूद केला आहे. केंद्रातून ज्या मान्यता हव्या आहेत त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला येऊन प्रयत्न करणार आहेत. मध्यमवर्गीय माणूस जिथे राहतो त्यासाठीच हे प्राधिकरण आहे. सर्वसामान्य माणसाची काळजी स्वयंपुनर्विकास प्राधिकरणच येणाऱ्या काळात करणार असल्याचा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला. तसेच दरेकरांनी या सत्काराप्रती रमेश गायकवाड यांचे आभार मानत ‘प्रविण दरेकर आहे चमकता तारा, रमेश गायकवाड माझा सच्च्या मित्र प्यारा’, अशी कविता केली.
रिपाईच्या कार्यकर्त्यांनी या अभियानात झोकून देण्याची गरज
दरेकर म्हणाले कि, माझा सत्कार झाला, मी खुश झालो यापेक्षा रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वयंपुनर्विकास अभियानात झोकून देण्याची गरज आहे. स्वयंपुनर्विकास करण्यासाठी काय केले पाहिजे याचे नियोजन करा. तुम्हाला जी ताकद व मार्गदर्शन लागेल ते तुमच्या पाठीशी उभे करू. शिका आणि संघटित व्हा असा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. परंतु बेरोजगार तरुणांसाठीही रचनात्मक काम उभे करावे लागणार आहे. महिलांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. त्या समजून घेण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेमार्फत नुकतेच २०० महिलांना उद्योग- व्यवसायासाठी एक लाखाचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले. मी ज्या पदावर गेलो तिथे त्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांना कसा होईल याचाच विचार केला.
…तरच माझ्या सत्काराचा उपयोग होईल
दरेकर म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा वारसा आंबेडकर चळवळीला दिला. या समाजातील युवकांना दिशा देण्याची गरज आहे. शिकलेल्या मुलांना या प्रक्रियेत आणले पाहिजे. त्यांना दिशा आणि ताकद देण्याची गरज आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना आहेत. कार्यकर्त्यांनी त्या समजून, मार्गदर्शन घ्यावे. जेणेकरून मुंबईत आरपीआयचा कार्यकर्ता शासकीय योजना महिला व लोकांकडे नेऊन त्यांना सक्षम करण्याचे काम करतोय हा संदेश गेला पाहिजे, तरच माझ्या सत्काराचा उपयोग होईल, असे आवाहनही दरेकरांनी यावेळी केले.KK/ML/MS