वादळाचा तडाखा, झोक्यात झोपलेली चिमुरडी घरावरील छतासह गेली उडून …

बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली, अनेक झाडेही पडली. दरम्यान देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घडली. वादळाने घरावरील छत उडाले. यावेळी घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. झोका घराच्या छताला एका लोखंडी अँगललला बांधलेला होता.
वादळाने अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेला. साधारणतः २०० फूट अंतरावर पत्रे आणि झोका जमिनीवर आदळला. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती ६ महिन्यांची होती. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती. या घटनेने साखरे कुटुंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ML/ML/SL
12 June 2024