राजकोट किल्ल्यावर ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की …
सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मालवण राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्या समर्थकात आज जोरदार धुमचक्री उडाली . एकमेकांना धक्काबुक्की करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस अधिकारी आणि एक महिला जखमी झाली आहे. त्या ठिकाणी उग्र तणावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज या परिसरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. काही झाले तरी माघार घेणार नाही, यावरून दोन्ही गट काही काळ ठाम होते . त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत त्या ठिकाणचा तणाव अखेर दूर केला मात्र या दरम्यान दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारीचा प्रकार घडला.
दरम्यान महाविकास आघाडी तर्फे पुतळा प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी मालवण मध्ये मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. याआधी महाविकास आघाडी चे नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा निषेध करीत या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधिशां कडून करण्याची मागणी केली.
ML/ML/PGB
28 Aug 2024