अजितदादांचा मृत्यू घातपातानेच , त्रयस्थ चौकशीची मागणी
मुंबई दि १० : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमाना अपघाताचा मृत्यू हा केवळ घातपाताचा प्रकार असून यामध्ये सीआयडी सोबतच त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत केली आहे .
अजित पवार यांनी निवडलेली विमान कंपनी संशयास्पद असून या कंपनीबाबत अनेक शंका कुशंका आहेत. या कंपनीचे संचालक वादग्रस्त असून या कंपनीच्या विमानांना यापूर्वी झालेल्या अपघाताबद्दलचे निष्कर्ष अद्याप समोर का आलेले नाहीत. याशिवाय या कंपनीला युरोपमध्ये विमान उड्डाण करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे मात्र तरीही डीजेसीए यांनी त्यांना अद्याप का परवाना दिला आहे असे सवाल रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केले .
अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान तांत्रिकदृष्ट्या योग्य होते का, त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात आली होती का , त्याचे अहवाल उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या विमानाचा मुख्य पायलट आयत्यावेळी का बदलण्यात आला, मुख्य पायलटने अपघाताच्या वेळी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे समोर आलेले नाही आणि अपघात झालेल्या विमानाच्या संभाषणासंदर्भात देखील र अनेक शंका उपस्थित होतात असे पवार म्हणाले .
अपघातग्रस्त विमानाच्या पायलटने जी हवाई पट्टी सुरक्षित नव्हती त्या बाजूनेच विमान उतरवण्याचा प्रयत्न का केला, तशी परवानगी त्याने का मागितली, या पायलट वरती कारवाई झालेली होती मात्र तरीही त्याला पुन्हा उड्डाणाची परवानगी का देण्यात आली असे सवाल देखील रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी या विमान अपघाताबद्दल स्वतः गोळा केलेली माहिती माध्यमांसमोर सादर केली आणि त्यात अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. या विमान अपघाताबद्दल सीआयडी चौकशी करत आहे मात्र त्यांना तांत्रिक दृष्टीने चौकशी करणे शक्य नाही त्यामुळे एका त्रयस्थ यंत्रणेमार्फत ही चौकशी करण्यात यावी आणि जोवर आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोवर आपण शांत बसणार नाही असेही रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.ML/ML/MS