आता ‘रोबोट’ करणार महापालिकेच्या भुयारी ड्रेनेज चेंबरची सफाई..
सांगली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली महापालिका क्षेत्रातल्या भुयारी ड्रेनेज चेंबर सफाईचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करणार नाहीत,कारण आता हे काम चक्क रोबोट करणार आहे.या अत्याधुनिक “रोबोटचा” लोकार्पण सोहळा कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.
सांगली महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास सात हजारहून अधिक भुयारी चेंबर आहेत.प्रत्येक वेळा या ठिकाणी ड्रेनेज मेनव्हॉल साफसफाई आणि गाळ काढण्यासाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना उतरावं लागतं,यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचा आरोग्य आणि जीव नेहमीच धोक्यात असते,गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीत भुयारी ड्रेनेज चेंबर मध्ये उतरून सफाई करताना कामगारांना जीव गमवावे लागले आहेत.
त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून अशा धोकादायक सफाईसाठी थेट स्वयंचलित रोबोट यंत्रणा खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल 39 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.आता यातून एक अत्याधुनिक रोबोट यंत्रणा महापालिकेकडून खरेदी करण्यात आली आहे.कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते या रोबोटचा लोकार्पण सोहळा मिरजेमध्ये पार पडला आहे.
सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिका नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा अत्याधुनिक रोबोट आता सांगली महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दिंमतील असणार आहे आणि खोलवर असणाऱ्या चेंबर मधील संपूर्ण सफाई हा “रोबोट” करणार आहे.त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्य आणि जीव वाचण्याबरोबर ड्रेनेज सफाईचं काम सुपरफास्ट होणार आहे.
ML/KA/SL
5 May 2023