रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट झाले नवे पोप
 
					
    व्हॅटिकन सिटी, दि. ९ : रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट (वय ६९) यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वतःसाठी पोप लिओ-१४ हे नाव निवडले आहे. १३३ कार्डिनल्सच्या दोन तृतीयांश बहुमताने (८९ मते) त्यांची पोप म्हणून निवड झाली. १९०० नंतर दोन दिवसांत नवीन पोपची निवड होण्याची ही पाचवी वेळ आहे.
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, रोमन कॅथोलिक चर्चच्या सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर निघत होता, जो नवीन पोपची निवड झाल्याचे दर्शवितो. नवीन पोपची निवड होताच व्हॅटिकनमध्ये उपस्थित असलेल्या ४५ हजारांहून अधिक लोकांनी टाळ्या वाजवून एकमेकांचे अभिनंदन केले. पोप म्हणून निवड झाल्यानंतर, पोप लिओ-१४ यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून स्पॅनिश भाषेत लोकांना संबोधित केले. त्यांनी लोकांना इतरांवर दया दाखवण्याचे आणि प्रेमाने जगण्याचे आवाहन केले.
 
                             
                                     
                                    