ऋतुराज गायकवाडचा जागतिक विक्रम
अहमदाबाद,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघातील सलामीचा युवा फलंदाज ऋतूराज गायकवाडने आज एका षटकात सात षटकार ठोकून जागतिक विक्रम केला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतूराजने आज विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत उत्तरप्रदेश विरुद्ध फलंदाजी करताना हा विक्रम केला आहे. उत्तरप्रदेशचा गोलंदाज शिवा सिंगच्या या षटकात एक चेंडू नो बॉल होता. अशा प्रकारे हे षटक सात चेंडूंचे होते आणि गायकवाडने या सातही चेंडूंवर षटकार ठोकले. त्याने एका षटकात एकूण 43 धावा केल्या. या डावात त्याने 159 चेंडूत 220 धावा केल्या. गायकवाडने या खेळीत 10 चौकार आणि 16 षटकार मारले.
गायकवाडच्या या खेळीमुळे महाराष्ट्राने 50 षटकांत पाच गडी गमावून 330 धावा केल्या. गायकवाडने या डावात सलामी दिली होती. त्याच्याशिवाय महाराष्ट्राच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. या स्पर्धेतील शेवटच्या 8 डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे.
महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत विजय हजारे ट्रॉफीची सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
SL/KA/SL
28 Nov. 2022