रिक्त जागेवर त्वरित घरे बांधा,अन्यथा कामगारांमध्ये असंतोष वाढेल! गोविंदराव मोहिते यांचे प्रतिपादन

मुंबई, :मुंबईतील रिक्त जमिनीवर राज्य सरकारने त्वरितच घरे बांधावीत, अन्यथा गिरणी कामगारांमध्ये असंतोष वाढेल,असा सावधगिरीचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना दिला आहे.
गिरणी कामगारां च्या घरांच्या अनिर्णि त प्रश्नावर बोलताना गोविंदराव मोहिते यांनी पुढे म्हटले आहे की, वरळी येथील सेंचुरी मिलची लीज संपल्यानंतर,सहा एकर जमीन मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात आली आहे. ती जमीन गिरणी कामगारांनाच घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. ती जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी न देता अन्य विकासकांना विकास करण्यासाठी देण्यात आली तर कामगारांवर अन्याय होईल.
बोरीवली खटाव येथील मॅरेथॉन व्यावसायिकाच्या ताब्यात असलेली फ्री होल्ड दहा स्क्वेअर मीटर आणि २० हजार स्क्वेअर मीटर, एक तृतीयांश प्रमाणे जमीन दिली पाहिजे होती, परंतु अद्याप ती देण्यात आलेली नाही. खरे म्हणजे लँड सीलिंग ऍक्ट प्रमाणे ती जमीन ताब्यात घेणे आवश्यक होते. एम.एम.आर.डी.ए.ने सुप्रीम कोर्टात लढा देऊनही तडकाफडकी माघार घेतली.या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी सातत्याने मागणी होत असतानाही ती डावलण्यात आली आहे,यातून निश्चितच कामगारांचा रोष वाढेल!
एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील घराबाबत गोविंदराव मोहिते म्हणाले,केंद्र सरकारने “एनटीसी’ च्या १४ गिरण्या अद्यापही बंद ठेवल्या आहेत. त्या जमिनी अन्य विकासकाला देण्यात आल्या तर गिरणी कामगारांना घरे मिळणे दुरापास्त होऊन बसेल. जर या गिरण्या केंद्र सरकार चालवू शकले नाही, तर या गिरण्यांच्या जमिनी कामगारांना घरे बांधण्यास मिळावयास हव्या. तेव्हा सरकारने या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणे शक्य होईल,अशी गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर आपली ठोस भूमिका मांडली आहे.KK/ML/MS