राइट व्हेल : शोकांतिका
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयूसीएन’ने गेल्याच वर्षी, ९ जुलै, २०२० रोजी राइट व्हेल या महाकाय सस्तन जलचरास ‘चिंताजनक’ प्रजातींच्या यादीमधून ‘अति गंभीर’ प्रजातींच्या यादीमध्ये समाविष्ट केले. त्याबद्दल समुद्री अभ्यासकांना फारसे आश्चर्य वाटले नाही. राइट व्हेल हा शिकारीचा धोका असलेला उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आढळणारा सरासरी ५२ फुट लांबीचा, ७० टन वजनाचा सस्तन जलचर. आज यांची संख्या जेमतेम ४००च्या आसपास घुटमळत आहे. एक मादी व्हेल दरवर्षी एकाच पिलास जन्म देते. जन्मलेले बाळ पोषणासाठी आईच्या शरीरास खेटून पोहत असते. आज जेमतेम १०० मादी व्हेलच शिल्लक आहेत. १९७२पासून शिकारीस बंदी असूनही ही संख्या घटली. मासेमारीच्या जाळ्याला बांधलेले लांब दोरखंड या व्हेलसाठी नकळतपणे फास ठरले आहेत. महासागरामधील ८५ टक्के व्हेल एकदा तरी या फासात अडकलेले आहेत, तर ६० टक्के व्हेल हे जहाजांच्या धडकेमुळे हाडे तुटून अपंगावस्थेत पोहत आहेत. २०१७मध्ये तब्बल ३१ राइट व्हेल अशा अपघातात मृत्युमुखी पडले. ६० वर्षे आयुर्मान लाभलेला हा जलचर आज या वयोमानास पोहचू शकत नाही, ही शोकांतिका आहे.
या सस्तन जीवाच्या या खुजेपणाला उत्तर अटलांटिक महासागराचे वाढते तापमान कारणीभूत आहे, असे डॉ. स्टिवार्ट म्हणतात. त्यांच्या मते, ‘तापमानात वाढ होताच राइट व्हेलचे भक्ष्य जागा बदलते, त्यामुळे गर्भवती आईची उपासमार होऊ लागते आणि बाळाची वाढ खुंटते.’ अन्न प्राप्तीसाठी होत असलेली या सागरी जिवाची ही अकांत धडपड ‘करंट बायॉलाजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या जूनच्या अंकात डॉ. स्टिवार्ट यांनी विज्ञानाच्या भाषेत शब्दबद्ध केली आहे. महाकाय शरीराची ही प्रजाती आक्रसणे ही इशाऱ्याची घंटा आहे. याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
ML/ML/PGB 23 Oct 2024