राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या जवळपास वर्षभरापासून खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला भारतीय कुस्ती महासंघ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर आता भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. मात्र आता मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करुन अध्यक्ष संजय सिंह यांचे निलंबन केले आहे.
संजय सिंह (Sanjay Singh) यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. या निवडीनंतर बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकने नाराजी व्यक्त करत कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.तसेच बजरंग पुनियानेही (Bajarang Punia) आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींकडे परत केला होता. या प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच अध्यक्ष संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित संस्थेला निलंबित केल्यानंतर, माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या आणि मंडळाची स्थापना झाली… आता फेडरेशन सदस्यांचा निर्णय आहे की त्यांना सरकारशी बोलायचे आहे की कायदेशीर कारवाई करायची आहे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही”.
SL/KA/SL
24 Dec. 2023