अंधेरीतील पाणीपुरवठा पूर्ववत

 अंधेरीतील पाणीपुरवठा पूर्ववत

मुंबई दि.24( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १,२०० मिलीमीटर व्यासाच्‍या जलवाहिनीची लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) बुधवारी दुपारी पावणे तीन वाजताच्‍या सुमारास निखळल्‍याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. हे समजताच महापालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्‍थळी धाव घेत जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम तातडीने हाती घेतले. पालिकेने तात्काळ कार्यवाही करत तब्‍बल आठ तास अव्‍याहतपणे काम करत बुधवारी रात्री अकरा वाजता जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्‍यामुळे लोखंडवाला संकुल परिसर, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसराचा गुरूवारचा पाणीपुरवठा नियितपणे आणि सुरळीत झाला .

बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्‍याच्‍या सुमारास आदर्श नगर जलबोगदा ते मिल्‍लत नगर दरम्‍यानची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आदर्श नगर रस्‍ता येथे फुटली. वेल्‍डींग केलेली लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) निखळल्याने पाणी बाहेर वाहू लागले. त्यानंतर पालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्‍थळी तातडीने धाव घेतली. सदर जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करुन पाणी गळती त्वरेने थांबवली. त्यानंतर लगेचच जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्‍यात आले. जलवाहिनीतून पाणीउपसा केल्यानंतर वर्कींग मॅनहोल नव्‍याने बसविण्‍यात आले. यानुसार १५ जणांच्‍या चमूने सलग आठ तास कार्य करत जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम पूर्ण केले.

SW/KA/SL

24 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *