रेशीम शेतीने वेधले शेतकऱ्यांचे लक्ष…
चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपरिक शेत पिकांसह शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण जोडधंदा उभारून उत्पन्न वाढविण्याचा दृढनिश्चय करून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मजरा (रै) येथील युवा शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर शेतात रेशीम उद्योग साकारला आहे. या उद्योगातून तो वर्षाकाठी पाच लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळवत आहेत. त्याला आता मनरेगा योजनेचा लाभ देखील मिळाला असून विजय मधुकर क्षिरसागर हा ३० वर्षीय शेतकरी अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरलाय. विजयची गावात वडिलोपार्जित दहा एकर शेतजमीन आहे.
या शेतीत कापूस, तूर,सोयाबीन,चना,गहू ही पारंपारिक पिके घेतली जायची. परंतू त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे विजयने शेतीमध्ये पारंपरिक पिकांबरोबरच काहीतरी नवीन प्रयोग करून वेगळा पूरक जोडधंदा उभारून उत्पन्न वाढीचे प्रयत्न चालविले होते. त्याने यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतले आणि विविध जिल्ह्यातील रेशीम उद्योग शेतीला भेटी दिल्या व माहिती घेतली. 2018 साली त्याने स्वतःच्या शेतात रेशीम शेती उद्योग करण्याचे ठरवले. स्वतः च्या शेतात शेड बांधून जिल्हा रेशीम कार्यालय चंद्रपूरच्या माध्यमातून रेशीम कीटक संगोपन गृह वर्धा यांच्याकडे संपर्क साधला व रेशीम कीड आणि त्यांचे खाद्य असलेली तूती रोपे खरेदी केली. अठ्ठावीस दिवसांच्या तिसऱ्या अवस्थेनंतर रेशीम अळ्यांनी कोष तयार केली. पूर्ण कोष तयार झाल्यानंतर सिकंदराबाद, जालना, पूर्णा,बडनेरा येथील बाजारपेठेत विक्री होते. या कोषाला प्रति क्विंटल ५५००० ते ६०००० रुपये दर मिळतो. जिद्द आणि चिकाटीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एखादे काम केले तर काय होऊ शकते हे विजय क्षिरसागर यांनी दाखवून दिले आहे. तो युवा शेतकऱ्यांसाठी आदर्श व आशेचा किरण ठरला आहे.
ML/KA/PGB 26 APR 2023