मुंबई विद्यापीठातील संशोधकांनी उलगडले सौर वादळाचे रहस्य
मुंबई, दि. १५ : मे २०२४ मधील गॅनन्स सुपरस्टॉर्मचा रहस्य उलगडण्यात भारतीय संशोधकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून मुंबई विद्यापीठाचा सहभाग जागतिक अवकाश संशोधनात भारताचे स्थान अधोरेखित करणारा ठरला आहे. मे २०२४ मध्ये पृथ्वीवर आलेल्या गॅनन्स सुपरस्टॉर्मला दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली सौर वादळ मानले जाते. द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सूर्यावरून सलग अनेक प्रचंड कोरोनल मास इजेक्शन (CMEs) झाले. या उद्रेकांमुळे अवकाशात तब्बल १.३ दशलक्ष किमीचा चुंबकीय पुनर्संयोजन प्रदेश निर्माण झाला, जो पृथ्वीच्या आकाराच्या जवळपास १०० पट होता. या प्रक्रियेमुळे वादळाची तीव्रता अपेक्षेपेक्षा अधिक वाढली आणि पृथ्वीच्या चुंबकीय संरक्षण कवचावर मोठा परिणाम झाला. परिणामी उपग्रह संचलन, GPS, संप्रेषण व्यवस्था आणि वीजपुरवठा प्रणालींवर गंभीर परिणाम दिसून आले.
या संशोधनासाठी भारताच्या आदित्य-एल१ मोहिमेने निर्णायक डेटा पुरवला. L1 बिंदूवरील त्याचे निरीक्षण आणि चुंबकीय क्षेत्राचे अचूक मोजमाप यामुळे वादळाच्या तीव्रतेमागील कारणे स्पष्ट झाली. याशिवाय नासाच्या सहा अंतराळयानांनीही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. संशोधनाचे नेतृत्व इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील डॉ. अंकुश भास्कर आणि त्यांचे विद्यार्थी शिबितोष बिस्वास यांनी केले. मुंबई विद्यापीठाचे प्रा. अनिल राघव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी विद्यार्थी अजय कुमार व कल्पेश घाग यांनी डेटा विश्लेषणात योगदान दिले.
या अभ्यासात असेही स्पष्ट झाले की दोन प्रचंड CMEs पृथ्वीच्या दिशेने येताना एकमेकांवर आदळले. या धडकेमुळे आतल्या चुंबकीय क्षेत्ररेषा तुटून पुन्हा जोडल्या गेल्या, ज्याला मॅग्नेटिक रिकनेक्शन म्हणतात. यामुळे वादळाची तीव्रता आणखी वाढली आणि पृथ्वीवर परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त झाला. या शोधामुळे भविष्यातील सौर वादळांचे अंदाज अधिक अचूकपणे बांधता येतील, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
मुंबई विद्यापीठाने या सहभागाला “अभिमानाचा क्षण” म्हटले असून पुढील काळात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. या संशोधनामुळे भारताचे अवकाश विज्ञान क्षेत्रातील योगदान जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे. आदित्य-एल१ मोहिमेच्या यशामुळे भारताने केवळ अवकाश संशोधनातच नव्हे तर स्पेस वेदर प्रेडिक्शनमध्येही महत्त्वाची भर घातली आहे.
SL/ML/SL
SL/ML/SL