मुंबई विद्यापीठात स्थापन होणार आदिवासी समुदायावर संशोधन केंद्र

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट’ची स्थापना केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केली.
या केंद्राच्या माध्यमातून कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांमध्ये अशी केंद्रे कार्यान्वित केली जात असून पालघर, किनवट, मेळघाट, गडचिरोली या क्षेत्रातील आदिवासी समुदायावर संशोधन करून या प्रवर्गाच्या विकासाच्या योजना आणि धोरण निश्चितीसाठी उपयोगी ठरणार आहे. ट्रायबल रिसर्च अँड नॉलेज सेंटरशी करार करून व्यापक स्वरूपात संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
राज्यातील प्रमुख आदिवासी समुदायांमध्ये गोंड, भील, महादेव कोळी, वारली, कोकणा, ठाकर, हल्बा, आंध, कटकरी, कोलाम आणि कोरकू यांचा समावेश होतो. ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे आदिवासी लोकसंख्येची प्रमुख ठिकाणे आहेत. आदिवासी समुदायाला विस्थापन, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या कमतरतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मुंबई विद्यापीठातील या संशोधन केंद्रामुळे आदिवासींचे प्रश्न अधिक सखोलपणे जाणून घेण्यास मदत होऊ शकते.