प्रख्यात उद्योजक रत्न टाटा यांच निधन, राज्यात एक दिवसाचा दुखवटा
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं काल रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए या ठिकाणी हलवण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.त्यानंतर संध्याकाळी त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे.