प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन……

 प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन……

पुणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चेहऱ्याला केवळ रंग लावणं म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणं आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणं महत्त्वाचं असतं. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसतं अशी धारणा बाळगणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते.

ते ब्रेनट्यूमर आजाराने ग्रस्त होते आणि त्यानंतर त्यांचे एकएक अवयव निकामी होत गेले. शुक्रवार पेठ येथे मुलीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.Renowned costume designer Prabhakar Bhave passed away.

आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रंगभूषाकार म्हणून त्यांची सुमारे 55 वर्षांची कारकीर्द होती. महाराष्ट्रातील सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते. मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. रंगभूषा नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले असून पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

चांगला रंगभूषाकार होण्यासाठी चित्रकला आणि शिल्पकलांचं ज्ञान असणं आवश्‍यक आहे. तसंच वाचनाची गोडीही हवी. त्याशिवाय, रंगांच्या माध्यमातून ‘कॅरॅक्‍टर’ उभं करता येत नाही; पण “कॅरॅक्‍टर’नुसार योग्य रंगभूषा करता आली तर कलाकार खुलतो. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. म्हणून मला रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच वाटतो, या भूमिकेतून भावे यांनी या क्षेत्राकडे पाहिलं .

तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील “भावेकाका’ अशी ओळख असलेले प्रभाकर भावे सलग अनेक वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा करत होते. मूळचे साताऱ्याचे असलेल्या भावेकाकांना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड होती. परंतू सातारा मध्ये त्यांच्या कलेला पुरेसा वाव नसल्यानं ते पुण्यात आले आणि इथेच रमले .

ML/KA/PGB
10 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *