प्रख्यात अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन
पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपट सृष्टीत दिड दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे देखणे आणि डॅशिंग अभिनेते रवींद्र महाजनी (७४) यांचे आज निधन झाले. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला.
रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीयांसह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते रमेश परदेशी हे अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.
रवींद्र महाजनी हे ज्येष्ठ संपादक आणि समाजवादी विचारवंत ह.रा. महाजनी यांचे पुत्र होते. रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर हा देखील मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी वाटचाल करत आहेत. गश्मीर आणि रवींद्र या पितापुत्रांच्या जोडीने पानीपत आणि देऊळ बंद या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
रवींद्र महाजनी यांचे चित्रपट
आराम हराम आहे
लक्ष्मी
लक्ष्मीची पावलं
देवता
गोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
बेलभंडार
अपराध मीच केला
काय राव तुम्ही
कॅरी ऑन मराठा
देऊळ बंद
पानिपत
15 July 2023
ML/KA/SL