राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल या सभागृहांचे नामांतर

 राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल या सभागृहांचे नामांतर

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती भवनात भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटावं या हेतूनं ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ या दोन प्रतिष्ठित सभागृहांची नावं बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानुसार दरबार हॉलचं नामांतर ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोक हॉलचं नामांतर ‘अशोक मंडप’ असं करण्यात आलं आहे.

‘राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतींचं कार्यालय आणि निवासस्थान हे देशाचं प्रतीक आणि जनतेचा अमूल्य वारसा आहे. राष्ट्रपती भवनाच्या वास्तूला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथल्या वातावरणात भारतीय सांस्कृतिक मूल्ये प्रतिबिंबित व्हावीत, असाही प्रयत्न आहे. हे नामांतर हा त्याचाच भाग आहे, असं राष्ट्रपती सचिवालयानं गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दोन महत्त्वाच्या सभागृहांच्या नामांतराबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार वितरणासारखे महत्त्वाचे समारंभ आणि सोहळे आयोजित केले जातात. ‘दरबार’ हा शब्द भारतावर राज्य करणाऱ्या शासकांच्या आणि इंग्रजांच्या न्यायालयासाठी वापरतात. हा शब्द पारतंत्र्याची आठवण देणारा आहे.

भारत देश प्रजासत्ताक झाल्यानंतर अशा प्रतीकांची प्रासंगिकता उरलेली नाही. प्राचीन काळापासून भारतीय समाजात ‘गणतंत्र’ ही संकल्पना खोलवर रुजली असून, ‘गणतंत्र मंडप’ हे या स्थळासाठी योग्य नाव असल्याचं मत बनलं.

राष्ट्रपती भवनाचा अशोक हॉल हा मुळात बॉलरूम होता. या हॉलचं नाव प्राचीन भारतातील सम्राट अशोक यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. सम्राट अशोक यांचा शासन काळ भारतातील सर्वसमावेशक व सहिष्णू मानला जातो. अशोक या शब्दाला विशेष अर्थही आहे. अशोक म्हणजे, सर्व दु:खापासून मुक्त किंवा कोणत्याही दु:खापासून अलिप्त. त्यामुळं अशोक हॉल हा भारतीय संस्कृतीशी नातं सांगणारा आहे. मात्र, त्यातील हॉल हा शब्द इंग्रजीकरणाच्या खुणा जपणारा होता. त्यामुळं अशोक हॉलचं अशोक मंडप करण्यात आलं आहे. शिवाय, त्यामुळं दोन्ही नावांमध्ये सारखेपणा येतो.

राष्ट्रपती भवनातील दोन प्रसिद्ध सभागृहांची नावं बदलण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ही दरबाराची संकल्पना नसून शहेनशाहची आहे, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होता.

SL/ML/SL

25 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *