सार्वजनीक ठिकाणांवरील भटके कुत्रे हटवा- सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली, दि. ७ : रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेत देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पूर्णतः हटवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे अशा कुत्र्यांना त्वरित हटवून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.
या आदेशानुसार, सर्व राज्य सरकारांना आठ आठवड्यांच्या आत अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली असून त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडून त्यांना शेल्टरमध्ये ठेवावे. तसेच, नसबंदी व लसीकरण केलेल्या कुत्र्यांची नोंद ठेवून त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडण्याऐवजी कायमस्वरूपी आश्रयगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामागील पार्श्वभूमी म्हणजे देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून अनेक नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध, यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. काही घटनांमध्ये मृत्यूही झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘Animal Birth Control Rules’ चा आधार घेत हा निर्णय दिला असून त्यात कुत्र्यांची योग्य देखभाल, नसबंदी, लसीकरण आणि पुनर्वसन यावर भर देण्यात आला आहे. या आदेशामुळे स्थानिक प्रशासनाला अधिक जबाबदारी पार पाडावी लागणार असून कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक संसाधने आणि शेल्टर होम्सची उपलब्धता सुनिश्चित करावी लागेल.
हा निर्णय जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
SL/ML/SL