बेदाण्यावरील जीएसटी हटवून शेतकऱ्यांना दिलासा…
सांगली दि २५– राज्यातील एक नगदी पीक म्हणून द्राक्षाकडे पाहिले जाते. या द्राक्षावर प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाणे तयार करतात. या बेदाण्यांना भारतीय आणि परदेशी बाजारात मोठी मागणी आहे, देशाच्या अनेक प्रांतातून बेदाण्याची निर्यात केली जाते. प्रक्रिया केलेला बेदाणा अन्न या कॅटेगिरीमध्ये येत असल्यामुळे आजपर्यंत स्टोरेज मालावर पाच टक्के आणि कोल्ड स्टोरेज बेदाण्यावर अठरा टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता. मात्र हा जीएसटी वगळण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाकडे अनेकवेळा केली होती.
शेतकरी स्वतः द्राक्षावर प्रक्रिया करून बेदाणे तयार करीत असतो त्यामुळे जीएसटीतून बेदाणा वगळण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. जीएसटी परिषदेच्या हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत बेदाण्यावरील जीएसटी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. सांगली, तासगाव , सोलापूर, नाशिक आणि कर्नाटक भागातील द्राक्ष तथा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.