पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी

 पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. राजस्थानमधील सीकर येथून देशभरातील 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करण्यात आला. 14वा हप्ता म्हणून 17 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये वर्ग करते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्ते (एकूण 6000 रुपये) दिले जातात. योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल-जुलैदरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबरदरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर- मार्चदरम्यान जमा केला जातो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती.

या योजनेचे पात्र लाभार्थी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारेदेखील स्वतःची नोंदणी करू शकतात. याशिवाय या योजनेसाठी राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले स्थानिक पटवारी, महसूल अधिकारी आणि नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करत आहेत.

पीएम किसानमधून वगळण्यात आलेले संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदांवर बसलेले शेतकरी कुटुंब, राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवारत किंवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी स्वायत्त संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त डॉक्टर, अभियंते आणि वकील यांसारखे व्यावसायिक तसेच 10,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असलेले निवृत्त निवृत्तीवेतनधारक आणि ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला आहे त्यांनाही योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

SL/KA/SL

27 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *