पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा धुडकावून, प्रताप सरनाईकांनी घेतली ‘टेस्ला’ कार

मुंबई प्रतिनिधी, दि. ५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवत त्याच्या मित्र पक्षाचे नेते राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परदेशी बनावटीची टेस्ला कार विकत घेतली. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून? असे प्रश्न उपस्थित करून भाजपाने यावर विशेष टिपण्णी करावी, असे प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सावंत पुढे म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने नोटीस बजावली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा नारा देताना म्हणाले आहेत की, पैसा काळा असो की गोरा असला तरी चालेल, त्यामुळे आता मंत्री सरनाईक यांनी अमेरिकेच्या कंपनीने बनवलेली टेस्ला ही कार घेतली, त्यासाठी दिलेले पैसा काळा होता का गोरा, हा प्रश्न आता काला धन नावाने बोंब ठोकणाऱ्या नरेंद्र मोदींनीच संपवला आहे, त्यामुळे अमेरिकेची कार घेताना कोणता पैसा वापरला याचे उत्तर गुलदस्त्यात राहील. मोदींनी परदेशी पैशात भारतीयांचा घाम मिसळला असला पाहिजे असेही म्हटले होते परंतु टेस्ला गाडी तर पूर्णपणे आयात केलेली आहे, त्यात भारतीयांचा घाम नाही.
कालपर्यंत माय फ्रेंड डोलान्ड ट्रंप, नमस्ते ट्रंप, अबकी बार ट्रंप सरकार, हाऊडी ट्रंप म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी नारा बदलून सध्या हिंदी चिनी भाई भाईचा नारा दिला आहे याचीही जाणीव शिवसेनेला नाही. त्यामुळे महायुती की जेल में सुरंग लावण्याचे काम आता मित्रपक्षच करत आहेत असा मिश्किल टोला सावंत यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला असला तरी ते स्वतः मात्र विदेशी आणि महगाड्या वस्तू वापरतात. नरेंद्र मोदी जर्मन बनावटीची बीएमडब्ल्यू कार वापरतात, इटालियन बनावटीचा Giorgio Armani सूट वापरतात. केनेथ कोल या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात, इटालियन कंपनीचे घड्याळ, कॉपर व्हिजन या अमेरिकन कंपनीचा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात. एवढेच काय ते खातात ते मशरूमही विदेशातून येते अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वदेशीचा नारा म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण”, असा प्रकार आहे असे सचिन सावंत म्हणाले.