११ वीच्या प्रवेशासाठी २५ मेपासून नोंदणीला सुरुवात
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिकांच्या हद्दीतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी २५ मेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. शिक्षण विभागाने याबाबतची घोषणा केली आहे. दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत.याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. निकालानंतर पुढील पाच दिवसांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर कॉलेजचा पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात होईल. निकालानंतर पुढील १० ते १५ दिवसांत शिक्षण विभागाकडून पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जाचा भाग भरण्याचा सराव करता यावा, यासाठी डेमो नोंदणीला २० मेपासून सुरुवात केली जाणार आहे. तर, २४ मेपर्यंत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर २५ मेपासून संकेतस्थळावर प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात होईल. दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच मार्गदर्शन केंद्रावरून ते तपासून प्रमाणित करून देण्याचे कामही सुरू होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दोन दिवस अर्जतपासणीचे काम सुरू राहील.
दरम्यान, प्रत्येक फेरीसोबतच समांतर कोट्यांतर्गत प्रवेशप्रक्रियाही राबविली जाणार आहे. ती पूर्ण करून ऑगस्टअखेर प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. यातील पहिल्या विशेष फेरीनंतर लागेचच ११वीचे वर्ग सुरू होणार आहेत.
SL/KA/SL
18 May 2023