‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा होणार बंद
मुंबई, दि. ५ : भारतीय पोस्टाने आपल्या सर्वात जुन्या सेवांपैकी एक असलेल्या ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवेला 1 सप्टेंबर 2025 पासून ‘स्पीड पोस्ट मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे आता ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा इतिहासजमा होणार आहे. “समान सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून कामकाजाला अधिक सोपे बनवणे आणि ग्राहकांना अधिक सुविधा देणे” हा या बदलामागचा मुख्य उद्देश असल्याचे इंडिया पोस्टने परिपत्रकात म्हटले आहे.
रजिस्टर्ड पोस्ट ही एक सुरक्षित सेवा आहे, ज्याद्वारे पत्र फक्त त्या व्यक्तीला मिळते, ज्याच्या नावावर ते पाठवले आहे. ही सेवा थोडी हळू असली तरी, ‘स्पीड पोस्ट’च्या तुलनेत कमी खर्चिक आहे. तर स्पीड पोस्ट ही सेवा वेळेच्या आत पत्र पोहोचवण्याला प्राधान्य देते. यात दिलेल्या पत्त्यावर कोणालाही पत्र स्वीकारता येते. ही सेवा 1986 पासून सुरू आहे.
रजिस्टर्ड पोस्टचा वापर घटला
पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा पूर्णपणे बंद होत नाहीये. ‘स्पीड पोस्ट’मध्येच ‘रजिस्ट्रेशन’ची सुविधा उपलब्ध असेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 2.50 रुपयांच्या पत्रासोबत रजिस्ट्रेशन हवे असेल, तर तुम्हाला अतिरिक्त 17 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, 5 रुपयांच्या पत्रासाठी रजिस्ट्रेशनसह 22 रुपये द्यावे लागतील. ही सेवा आता ‘स्पीड पोस्ट’ अंतर्गत उपलब्ध होईल.
“या निर्णयामुळे टपाल सेवा अधिक कार्यक्षम होतील, ट्रॅकिंग यंत्रणा सुधारेल आणि ग्राहकांना अधिक सोयीसुविधा मिळतील,” असे परिपत्रकात म्हटले आहे.
SL/ML/SL