क्लस्टर बाहेरील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य

मुंबई दि १५ — मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील क्लस्टर योजनेच्या बाहेरील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास तातडीने करण्यासाठी आवश्यक त्या परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बोलावलेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होते.
या बैठकीला नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असिम गुप्ता, मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, मीरा- भाईंदर महापालिका हद्दीमध्ये अनेक इमारती या जुन्या असून काही इमारती ग्रामपंचायत स्थापनेपासूनच्या देखील आहेत. या इमारती ६ मीटर रस्त्यालगत तसेच अरुंद गल्ली- बोळात असल्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे क्लस्टर बाहेर इमारतीचा विकास करण्याची योजना सुरू आहे. त्याच धर्तीवर मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील अशा धोकादायक इमारतींचा विकास करण्याची गरज आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याला या संदर्भात केस टू केस प्रत्येक इमारतीच्या पुनर्विकास आराखडा तयार करावा आणि तो तातडीने अमलात आणावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.ML/ML/MS